Wadil ani Mulagi
वडीलं होण्या इतपत जगात
कोणताच प्रचंड आनंद नाही
नि कन्या झाली तर कोणतचं सुख
त्याहून बेधुंद नाही...
.
मुठ आवळून तू बोट धरतेस
तो हरेक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास
होतो...
.
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे...
.
असावं लागतं पुण्यवान,
नि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
ज्या पित्याचे हात उरकती
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान...
मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही
मी झुगारत नाही...
.
संसारात रमण्या पेक्षा मी
मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर
मुलीचाच तर क्रम येतो...
.
बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात...
.
तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या
भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जागणं आहे...
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे...
.
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे...
.
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी
अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते...
.
आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं...
इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे...
.
मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा
अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो...
.
छे ती कुठे माझी मुलगी
ती तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य करेल
स्वप्नं नाही विश्वास माझा...