Sunday, 28 June 2015

या आईला काही कळतच नाही...


या आईला काही कळतच नाही...


या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही 
या आईला ना काही कळतच नाही




दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही 
या आईला ना काही कळतच नाही

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही




होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते 
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही

दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही...

Porichi Kalji..............

Porichi Kalji..............


अवश्य वाचा
एका पित्याने आपल्या मुलीला
केलेली जगाची खरी ओळख..

लक्षात ठेव पोरी,
तू तुकडा आहेस काळजाचा
विपरीत काही घडलं,
तर जीव जाईल आमचा.



तुला घराबाहेर पाठवायला,
मन आमचं धजत नाही.
पण शिक्षणापासून तुला दूर
ठेवावं, असही वाटत नाही.

तळ हातावरच्या फोडाप्रमाणे,
जपलय तुला काळजीने.
जाणिव ठेव त्याची आणि,
झेंडा लाव तुझ्या यशाचा
उच्छल, धांदरट राहू नकोस,
स्वप्नात उगीच गुंतू नकोस.

आरशापुढे उभं राहून,
वेळ वाया घालू नकोस.
मोहात कसल्या पडू नकोस,
अभ्यास करण्या विसरुं नकोस.

पैसे देवूनही मिळणार नाही,
तुझा वेळ आहे लाख मोलाचा.

मन जीवन तुझं कोरं पान,
त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस.

स्पर्श मायेचा की वासनेचा,
भेद करण्यात तू चूकू नकोस.

मोबाईल-संगणक आवश्यकच गं,
जाळ्यात त्यांच्या गुरफटू नकोस.



परक्यांवर विश्वास करू नकोस,
अनादर नको करू गुरूजनांचा
आपल्या पायावर ऊभे राहू
निश्चय कर मनाचा.

देहाचं प्रदर्शन करण्यासाठी,
संस्कार कपडे टाकू नको.

लाज वाटेल असं काही करण्यासाठी,
चेहरा उगीच झाकू नको.

चूकांना येथे नसतेच कधी माफी,
गेलेली अब्रूही परत येत नाही.

खूप जिव आहे तुझ्यावर बापाचा
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे,
सतत डोळा असतो समाजाचा.

असं विपरीत घडत असलं तरी,
आमचा तुझ्यावर विश्वास आहे
ग बाई
या जगाची ही खरी-खोटी
ओळख देतो तुला करून
माझी आई जीजाऊ, सावित्री
आणि अहिल्या,
किरण बेदीही तुझा आदर्श आहे.

युग आहे गुणांचं-स्पर्धेचं,
हिमतीनं तू संघर्षही करशील.
मात्र, यशावरती स्वार होण्याचा,
लगाम लागतो माझ्या पोरी संयमाचा.

लक्षात ठेव पोरी,
तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं,
तर जीव जाईल आमचा.


Sunday, 21 June 2015

Baap Zhalaas Naa????

Baap Zhalaas Naa????



___ बाप झालास ना... _______

             कवी - भालचंद्र कोळपकर

    बाप झालास ना आता, 
    तर, बापाच्या इमानास जाग,
    बाळांना लाज वाटणार नाही
    अस, आयुष्यभर वाग

वळवाच्या वादळी पावसागत
कोणावर आता कडाडू नको 
ठासुन भरलेली जवानीची तोफ
उगीच तोंडावाटे धडाडू नको



बायको तुझी आता 
फक्त बायको नाही राहिली 
अरे तुझ्या काळजाच्या तुकड्यांनी
तीच्यात एक जबाबदार आई पाहिली
     म्हणून , जे काही मागायचं ते
     एक पायरी उतरून माग
     बाप झालास ना आता 
     तर, बापाच्या इमानास जाग

घरट्यातील पिलांची जाणीव 
बेफाम लढणाऱ्या पक्षात असू दे
भांडणात शस्त्र चालवण्यापुर्वी
तू बाप आहे लक्षात असू दे

तुरुंगा पेक्षा तुझी गरज
तुझ्या बाळांना जास्त आहे 
पण, शस्त्रा ऐवजी प्रेमाची भाषा 
खरच , काय जबरदस्त आहे 
    म्हणून घरात असो नाहीतर बाहेर 
    आवरायला शिक तू राग 
    बाप झालास ना आता 
    तर ,बापाच्या इमानास जाग

भरधाव गाडी चालवताना
बाळाला आठवून दाब अँक्सीलेटर 
लूळा पांगळा बाप झालातर
स्वतःच्या नशीबावर फोडतील ते खापर



चुकून व्यसनाची वाट धरली असेल तर
आता तरी सोडून दे बाबा 
तुझ्या बाळाच्या बाळांनाही
धडधाकट मिळूदे आजोबा 

    उगीच घालू नको धोक्यात
    तुझ्या कुटुंबाची नवीन बाग 
    बाप झालास ना आता
    तर,बापाच्या इमानास जाग 

भ्रष्ट कमईच्या तळतळाटावर
बाळांना मोठं व्हायचं नाही 
लुबाडलेल्या प्रतिष्ठीत छताखाली
त्यांना कधीच रहायचं नाही 

म्हणून हे साऱ संसारासाठी करतोय 
हे सांगन्यात काही अर्थ नाही 
स्वाभिमानी बाप होण्यास
ते समजतील तू समर्थ नाही
  
 म्हणून त्याच्या आयुष्यावर पाडू नको 
  तुझ्या पापाचा डाग
     बाप झालास ना आता
     तर, बापाच्या इमानास जाग 
     तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही 
     असच आयुष्यभर वाग 
     बाप झालास ना आता
     तर, बापाच्या इमानास जाग

Saad Aai Chi

Saad Aai Chi


------साद आईची------------

महिनेमागून महिने, 
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते



पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला

शेवटपर्यंत सांगत होता,
 लेक माझा भला
तू मोठा साहेब, 
त्याचं मोठं कौतुक त्याला

माझ्याही ह्रदयात फोटो,
 तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.

दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला



वर्षाकाठी एक कपडा,
 पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने, 
पण तुला शाळेमधी घातला

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.

धुणी-भांडी करीन मी, 
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी

तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला 
तुझ्या घरी घेऊन जा.

थकले रे डोळे बाळा, 
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे 
आता मुश्किल झाले

विसरु कशी तुला मी, 
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण' 
पोरकी मी का झाले?

आता माझ्या थडग्यापाशी 
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर 
हा वृध्दाश्रम पाडून जा.

-मनिषा गायकवाड,राहुरी

Maher Mhanje Kaai????

Maher Mhanje Kaai????


एका विवाहीत मुलीचे आईस पत्र........

.

.
आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येते......
आता माझी सकाळ 5.30 ला होते आणि
रात्र 12 वाजता.......
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढते
आणि स्वतः मात्र शेवटी थंड जेवण जेवते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.

.
जेव्हा सासरी कुणी आजारी पडते..
तेव्हा त्यांच्या सेवेसाठी लगेचच हजर होते..
पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा
स्वतः ची काळजी स्वतःच घेते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
रात्री सगळे झोपल्यावर त्यांना
आठवणीने पांघरून घालते
पण जेव्हा मला पांघरूण घालायला
कुणीही नसते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
.
सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता
स्वतः लाच विसरते..
पण मन मोकळं करायला जवळ
कुणीही नसते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..

कदाचीत हीच कहानी लग्नानंतर
प्रत्येक मुलीची होत असेल.....
लग्नाअगोदर प्रत्येक मुलगा मुलीला
वचन देतो...
लग्न झाल्यावर सासरी तुला आईची
आठवण येउ देणार नाही......
पण तरीही का ???.........
आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येतेय ग...
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिची किंमत तिथे असे पर्यंत कळत नाही.

माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जी पैश्यांनी विकत मिळत नाही.

माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही.

माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही.

माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे रडणं हसणं
खिदळणं खाणं पिणं या शिवाय आपण काही करत नाही.

माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही.

माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे आई नाही तर काही नाही.

Cheu Tai Daar Ughad

Cheu Tai Daar Ughad


आपल्या मनाविरुद्ध काही झालं कि काही काही व्यक्ती खूप नाराज होतात, स्वतः वर चिडतात, आत्मविश्वास गमवून बसतात. सगळ्या जगाकडे पाठ करून, स्वतःच एकलकोंड असं जग बनवून बसतात. 
अश्या लोकांसाठी, एका चिमणीला उद्देशून मंगेश पाडगांवकर यांनी एक छान कविता लिहिली आहे. 

दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?



वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात 

कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .

दार उघड
चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !



प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
दार उघड
चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?

दार उघड
चिऊताई दार उघड !

- मंगेश पाडगावकर