Monday, 11 August 2014

Sukhanmage Dhawta Dhawta

Sukhanmage Dhawta Dhawta


सुखांमागे धावता धावता
विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग
भागत नाही तहान

स्वप्नं सत्यात आणता आणता
दमछाक होते खूप
वाटी वाटीने ओतलं तरी
कमीच पडतं तूप



बायका आणि पोरांसाठी
चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो
पण मागू नका वेळ

करिअर होतं जीवन
मात्र जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती
पैसा छापणारं यंत्र

चुकून सुट्टी घेतलीच तरी
पाहुणा 'स्वतःच्या घरी'
दोन दिवस कौतुक होतं
नंतर डोकेदुखी सारी

मुलंच मग विचारू लागतात
बाबा अजून का हो घरी ?
त्यांचाही दोष नसतो
त्यांना याची सवयच नसते मुळी



सोनेरी वेली वाढत जातात
घरा भोवती चढलेल्या
आतून मात्र मातीच्या भिंती
कधीही न सारवलेल्या
  
आयुष्याच्या संध्याकाळी मग
एकदम जाणवू लागतं काही
धावण्याच्या हट्टापायी आपण
श्वासच मुळी घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेलं

No comments:

Post a Comment