बहिण
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
No comments:
Post a Comment