Tuesday, 24 March 2015

पतीचे श्लोक

पतीचे श्लोक
 

मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घासघासून लादी
पसारा नको आवरा नीट गादी

मना सज्जना तोच राणी उठावी
तिची त्याक्षणी जीभ वेगे सुटावी
चहा पाजुनी थंड डोके करावे
पती चांगला नाव ऐसे मिळावे


त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरूरी असावा

प्रभाते मनी बायकोला भजावे
तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे
पगारास हाती तिच्या सोपवावे
कमावून जास्ती तिला तोषवावे


तिचे पाय रात्री जरासे चुरावे
माका तेल ते चोळुनी जे मुरावे
निजायास गादी उशी शाल द्यावी
अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी

नको रे मना बोल ते बायकोचे
असे की जणू बाण छातीत टोचे
तिच्या ह्या जिव्हा कोण घाले लगाम
अश्या शूरवीरा हजारो सलाम


अशी बायको ही कशी आवरावी
तिची भ्रष्ट बुध्दी कशी सावरावी
कुणी थोर तो काय सांगेल युक्ती
तया पावलांची शिरी लावु माती

कसा जीवघेणा अघोरीच त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
तुम्हा सांगतो नीट ध्यानी धरावे
मरावे परी लग्न कधी न  करावे

- जय जय पतीवीर समर्थ...

No comments:

Post a Comment