Wednesday 8 November 2017

अरे राजा ये ना

अरे राजा ये ना

 

अरे राजा ये ना
नको ग आई

नोकरी मला लागू दे
डॅालर जरा कमवू दे
कर्ज माझे फिटू दे
मग मी येईन

अरे राजा ये ना
नको ग आई



गर्दी किती तिथे
राहू मी कुठे?
घर मला घेऊ दे
मग मी येईन

अरे राजा ये ना
नको ग आई

रस्ते तिथे छोटे
त्यात खड्डे मोठे मोठे 
शिस्त नाही कुठे 
हॅार्नच्या आवाजाने कानच फाटे

नाही गुणांची कदर
नाही बुध्दीचाआदर
भ्रष्टाचाराचा कहर
कसा जमायचा वावर ?

स्वच्छतेचा अभाव
सत्ता संपत्तीचा प्रभाव
आरक्षणाचा दबाव
कसा लागेल माझा निभाव?

तुला सांगतो एक खरे
वाटते इथेच आता बरे
आई बाबा तुम्हीच  
इथे येता का सारे?

आई तू ये ना
नको रे राजा

आई तू ये ना
नको रे राजा



तू म्हणतोस ते खरे
इथे नाही आता बरे
पण कारण याला
आम्हीच तर सारे

कुणी राहिले गप्प
आळी मिळी चुप्प
देश सोडून कुणी
निघून गेले हुप्प

नाही पुढाऱ्यांना टोकले
ना भ्रष्टाचाराला रोकले
ना न्यायासाठी झटले
नाही एकतेला जपले

नाही शिस्तीचे पालन
ना संस्कृतीचे जतन
नाही निसर्गाचे संवर्धन 
शिक्षणाचे निमूट, पाहिले पतन.

ना सत्याचा आग्रह
ना कर्तव्याचा निग्रह 
ना मूल्यांचा संग्रह 
केला धर्माचा दुराग्रह

आता मात्र  वाटते
सुधारायचे हे चित्र 
देशाला बदलायचे
येऊन साऱ्यांनी एकत्र

मिळून आम्ही सारे
आणू बदलाचे वारे.
मग तरी तुम्ही सारे
परतून याल का रे?

No comments:

Post a Comment