Sunday, 21 December 2014

Shala

|| शाळा ||




तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो अन पाटी-दप्तराच ओझ,
पाठीवरती वाह्याचो.......|| धृ ||

घर माझ शाळेपासून, होत लई दूर.....!  
प्रार्थनेला उशीर झाला की, गुरुजी करायचे कुरकुर.....!   
 मग हिवाळा असो कि उन्हाळा,
मी अनवाणीच पळायचो   ......||१||


  तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
  शाळेमधी जायाचो......!!

माय माझी मजुरीच्या, कामावरती जायाची.....!  
शाळेमधी चटणी-भाकर, बांधून फडक्यामधी द्यायची.....!
 मग दुपारच्या सुट्टीत मी, ती आवडीन खायाचो .......||२|| 



 



          



     तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
     शाळेमधी जायाचो......!!

नाही विचारलं कधी कुणी मला, तुला शाळेत काय येत......!  
तरी जवळ घेऊन माय म्हणायची, लेकरू माझ शाळेमधी जात......!
लाड-लाड मग मी तीला, चार-आठ आणे मागायचो......||३||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
      शाळेमधी जायाचो......!!

आठवड्याच्या बाजारातून आईन मला, एक सदरा अन चड्डी घेतली होती.......!
 रोज-रोज तीच-तीच घालून, ती नको तिथ फाटली होती......!
तरी मी तीला मोठ्या, आवडीने घालायचो.....||४||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!  

गुरुजी माझे लई कडक, त्यांची शिस्त होती भारी.......!
नजरेच्या धाकानेच नुसती, मुले गप्प बसायची सारी.......!
तरी नजर चुकवून त्यांची, मुला-मुलिंची खोडी काढायचो.......||५||
          
       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

खेळ खेळतांना अशी, ताकद अंगात यायची.....!
आट्या-पाट्या नि विटी-दांडूची, रंगत वाढत जायची......!  
कधी व्हायचा रडीचा डाव, मग एकामेकासंगे भांडायचो......|| ६||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

रविवारची सुट्टी तर, भारीच मला आवडायची.....!  
गाई-म्हशी चारतांना, चिंचा नि बोरे खायाची......!  
नदी मधल्या खोल डोहात, मनसोक्त पोहायचो......|| ७|| 


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

गण्या,सुक्या,मोहन्या शाम्या, माझे मित्र होते कोळ्याचे.....!  
मासे धरतांना ओले कपडे, नेहमी अंगावरच वाळायचे.....!
माशासंग खेकड्याच्या नांग्या, नदीलाच भाजून खायाचो......||८|| 




     तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
     शाळेमधी जायाचो......!!

पाचवीत गेल्यावर मला, नवीन भाषा इंग्रजी आली......!  
तेव्हा पाढ्यासारखी घोकून-घोकून, ए-बी-सी-डी पाठ केली......!  
कधी-कधी यू नंतर व्ही एवजी व्ह्यू म्हणायचो, अन छडीचा मार खायाचो......||९||

       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

परीक्षा जवळ आली की, माझ्या पोटात यायचा गोळा......!
 गुरुजी म्हणायचे नेहमी, मुलांनो अभ्यास करून खेळा......!
 समजून अस सांगतांना, त्यांच्यात मी माझी माय पाहायचो......||१०||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

पूर्वी सारखे नाही राहिले आता, शिक्षण आणि शाळा......!
 नवनविन धोरणांनीच घोटलाय, आज विद्यार्थ्यांचा गळा......!  
इतक हसत खेळत शिकलो तरी, चांगल्या मार्कांनी पास व्हायाचो....||११||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!
       अन पाटी-दप्तराच ओझ,
       पाठीवरती वाह्याचो.......|| धृ ||

No comments:

Post a Comment