Thursday 20 August 2015

प्राणसखी

प्राणसखी


घरी असलीस म्हणजे सारखे
 " हे करा अन् ते करा "
पेपर खाली पडला तरी
" किती हो केला पसारा "

म्हणून म्हटले चार दिवस
जावून ये तु माहेरी
निवांत आणि सुखाने
एकटाच राहीन घरी



सोडून आलो तिला मग
आनंदाने काल
काय सांगू मित्रांनो
तुम्हा माझे हाल

सकाळीच उठल्यावर
आधी कचरा काढू
सगळे कोपरे धुंडाळले पण
सापडला नाही झाडू

ठेवला कचरा तसाच म्हटलं
दात घासू बेस्ट
ब्रश तर सापडला पण
कुठे ठेवली पेस्ट

आंघोळीला गारच पाणी
वाटेल म्हटलं छान
टॅावेल राहीला बाहेरच
कुणाला सांगू आण

सापडेना पातेले 
दुधवाला आला
इकडून तिकडून सापडले तर
झाकण नाही त्याला



चहा करायला गेलो तर
सापडेना साखर
गॅस काही पेटेना
बिघडलेला लायटर

दुपारचे जेवण खाणावळीत
तिखट किती भाजी
जाड जाड पोळ्या खायला
मन होईना राजी

वरण खुप पातळ अन्
भातालाही कणी
तोंडात घास घालताच
डोळ्यांत आले पाणी

वाटे कटकट तुझी राणी
तु घरी असताना
जीवन सारे सुने वाटे
तु जवळ नसताना

मी जर असेल शिव तर
तु माझी शक्ती
सदा जवळी असावीस तु
हीच आता आसक्ती

सहचारिणी हे प्राणसखे
विनवितो मी गं तुला
जेव्हा कुठेही जाशील तु
घेऊन जा गं मला.

No comments:

Post a Comment