Tuesday 1 July 2014

शाळेतला जुना बाक

शाळेतला जुना बाक


परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला... 

"ओळखलसं का मला?", विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला, हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे, पैसा कमावलासं छानं"



"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...

भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
अजुनही भेटतात का रे,
पक्या, मन्या, बंटी...?

टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?



निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...

मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...

एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?

कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...

बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...

कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
 
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...

वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...

परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...

No comments:

Post a Comment