Saturday 25 June 2016

काही नसण़्यातच होता आनंद मोठा

काही नसण़्यातच होता आनंद मोठा


आर्थिक स्टेबिलिटी मिळवताना
बरच गणित चुकत जातं 
"नसण्यातच आनंद असतो "
उत्तर शेवटी हाती येतं !

लहानपणी शाळे मधे 
एकच ड्रेस असायचा 
खाकी चड्डी पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा

पायात चप्पल असणं
ही लक्झरी असायची 
गावात एखाद्या कडेच
"बाटाची"चप्पल दिसायची!



रेशनच्या दुकानावर 
लोकं चकरा मारायचे 
तवा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे !

वरच्या वर्गात जाताना 
पुस्तक जुनेच असायचे 
शुभंकरोती आणि बे एक बे मात्र पोरं
घरोघरी  म्हणायचे !

सडा, सारवण, धुणं, भांडी 
बायकांना तर आरामच नव्हता
ज्याच्याकडे ' पाणी तापवायचा बंब '
तोच सगळ्यात श्रीमंत होता !

दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचं
खऊट खोबर्याच्या तेला मधे
वासाच तेल असायचं !!

कुठला मोती साबण
अन कशाची काजू कतली 
माया, प्रेम एवढं होतं की
गोड लागायची वातड चकली !!

भात, पोळी , गोडधोड
सणासुदिलाच व्हायचे 
पाहुण्याला गरम नी
घरच्याला गार पोळी वाढायचे !


पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स 
आजकाल रूटीन असतं
गरीबीला लपवणं
फारच कठिण असतं.....

स्वयंपाक घरात आता भरपूर
किराणा भरलेला असतो 
खाऊ घालायची वासनाच नाही
म्हणून लोणच्याला बुरा येतो? 

हल्ली आता प्रत्येकाच्ं
पैकेज फक्त मोठ्ठ असतं 
दिवाळीच्या दिवशी सुद्धा
पॉश घर "भकास " वाटतं ?

का बरे पहिल्यासारखे 
पाहुणे आता येत नाहीत ?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत.....

काय तर म्हणे आम्ही आता 
हाय फाय झालो !
चार पैसे आल्यामूळे, खरंतर
सगळेच पुरते वाया गेलो !!

कशामुळे घात झाला 
काहीच का कळत नाही ?
एवढं मात्र खरं की
पहिल्यासारखं
सुख आता अजिबात मिळत नाही ?

प्रगती झाली की अधोगती ?
काहीच उमजेना ??
माणसाला माणसाकडून 
अजिबात प्रेम मिळेना ?

अहंकार कुरवाळल्याने
प्रेमाचे झरे आटलेत
अन् आधार गमावल्यामुळेच
" सायक्याट्रिस्ट " जवळचे झालेत !!

भ्रमामध्ये राहु नका 
जागं व्हा थोडं.....
माणसाशिवाय माणसाचं
सुटत नसतं कोडं !

No comments:

Post a Comment