Saturday 25 June 2016

कोकण

कोकण

 कोकण म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व
तिला आधार देणारा दिवा....
-----------------
कोकण म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि
गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.....
----------------
कोकण म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा,
त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या....
-------------------
कोकण म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं
जातं, आज्जीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर
झालेला कारभारणीचा चेहरा,


------------------
कोकण म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ,
सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर,....
-------------------
कोकण म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव,
रोखून बघत असलेले मानाचे दगड.......
-----------------
कोकण म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ......
-------------------
कोकण म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण,
त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई......
--------------------
कोकण म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडलांची पुण्याई....
---------------------
कोकण म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी 
माडापोफळीची झाडं.....
--------------------
कोकण म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि 
कण्हेरीची फुलं.....  
----------------------
कोकण म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं,
चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण,
--------------------
कोकण म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला
बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा......
-----------------------
कोकण म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या
आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.....
----------------------
कोकण म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे
आणि वाटप घातलेली उसळ,
-----------------
कोकण म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली
पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत
असलेलं लोणचं.....


-----------------
कोकण म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार
पाउस, आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर....
------------------
कोकण म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं,डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.....
----------------
कोकण म्हणजे लाल डब्याची एष्टी, धुरळा आणि
नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.....
--------------------
कोकण म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा भात उसळ
आणि लाऊडस्पीकर....
------------------
कोकण म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक,
उसळ आणि डबलबाऱ्या,
---------------
कोकण म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट,
करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल,
----------------
कोकण म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा......
-------------------
कोकण म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती,
शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्या आणि
पोरांचं भजन..   
--------------------
कोकण म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा,
पूजा , शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं........
------------------
कोकण म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप,
धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला,
---------------------
कोकण म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं,पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि "टुरलामेंट"........
--------------------
कोकण म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा,
ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं,चकवणारे मासे, लागलेली रापण,
ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका.....
---------------'-----
कोकण म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या
माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या,
------------------
कोकण म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची
तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय
आणि सगळ्याचे डोळ्यात आलेलं पाणी,
खूप काही सांगू पाहणारा, 
पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा
काशीविश्वेश्वराचा एक डाव..

No comments:

Post a Comment