Saturday, 25 June 2016

एका पित्याने आपल्या मुलीला केलेली जगाची खरी ओळख

एका पित्याने आपल्या मुलीला केलेली जगाची खरी ओळख

लक्षात ठेव पोरी,
तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं,
तर जीव जाईल आमचा.

तुला घराबाहेर पाठवायला,
मन आमचं धजत नाही.
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं,
असही वाटत नाही.



तळ हातावरच्या फोडाप्रमाणे,
जपलय तुला काळजीने.
जाणिव ठेव त्याची आणि,
झेंडा लाव तुझ्या यशाचा.

उच्छल, धांदरट राहू नकोस,
स्वप्नात उगीच गुंतू नकोस.
आरशापुढे उभं राहून,
वेळ वाया घालू नकोस.
मोहात कसल्या पडू नकोस,
अभ्यास करण्या विसरुं नकोस.

पैसे देवूनही मिळणार नाही,
तुझा वेळ आहे लाख मोलाचा.
मन जीवन तुझं कोरं पान,
त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस.

स्पर्श मायेचा की वासनेचा,
भेद करण्यात तू चूकू नकोस.
मोबाईल-संगणक आवश्यकच गं,
जाळ्यात त्यांच्या गुरफटू नकोस.

परक्यांवर विश्वास करू नकोस,
अनादर नको करू गुरूजनांचा.
आपल्या पायावर ऊभे राहून,
निश्चय कर मनाचा.



देहाचं प्रदर्शन करण्यासाठी,
संस्कार कपडे टाकू नको.
लाज वाटेल असं काही करण्यासाठी,
चेहरा उगीच झाकू नको.

चूकांना येथे नसतेच कधी माफी,
गेलेली अब्रूही परत येत नाही.
खूप जिव आहे तुझ्यावर बापाचा,
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे,
सतत डोळा असतो समाजाचा.

असं विपरीत घडत असलं तरी,
आमचा तुझ्यावर विश्वास आहे ग बाई.
या जगाची ही खरी-खोटी ओळख,
देतो तुला करून माझी आई.

जीजाऊ, सावित्री आणि अहिल्या,
किरण बेदीही तुझा आदर्श आहे.

युग आहे गुणांचं-स्पर्धेचं,
हिमतीनं तू संघर्षही करशील.
मात्र, यशावरती स्वार होण्याचा,
लगाम लागतो माझ्या पोरी संयमाचा.

लक्षात ठेव पोरी,
तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं,
तर जीव जाईल आमचा.

वेळच कुठंय् मला

वेळच कुठंय् मला

 
रात्र सरली, दिवस उगवला,
मोबाइलचा अलार्म आरवला,
सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?
मुलांना उठवा, डबा करा,
बसस्टापपर्यंत सोडवा चला,
मुलांचा गोड गोड पापा घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?


सर्वांच्या नाष्टयाच्या प्लेट भरा,
पटकन लागा स्वयंपाकाला,
स्वतःच्या पोटात दोन घास ढकलायला,
वेळच कुठंय् मला ?
आठ वाजताचा सायरन झाला,
उशीरच होतोय ऑफिसला,
आरशात बघून नट्टापट्टा करायला,
वेळच कुठंय् मला ?
वेळेत घरी जाण्यासाठी,
कामाचा ढीग हवा लवकर उपसायला,
सख्यांशी हितगुज करायला,
वेळच कुठंय् मला ?
ऑफिस सुटले, बाजारहाट करा,
जीव तळमळतोय मुलांना भेटायला,
गाडीच्या ओव्हरस्पीड कडे बघायला,
वेळच कुठंय् मला ?
नवऱ्याला चहा, मुलांचा अभ्यास,
हवा देवापुढे दिवा लावायला,
संध्याकाळचा वॉक घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?
रात्रीचा स्वयंपाक, उद्याची तयारी,
उशीरच होतोय झोपायला,
टिव्ही वरच्या मालिका बघायला,
वेळच कुठंय् मला ?


गोल गोल चक्रात अडकलेय मी,
गलेलठ्ठ पगार मिळवायला,
मात्र स्वतःसाठी खर्च करायला,
वेळच कुठंय् मला ?
लहान थोरांच्या दुखण्या-खुपण्याला,
रजा लागते आजारपणाला,
स्वतःचीच मात्र काळजी घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?
कधीकधी वाटते, अकस्मात काळ येईल,
जेंव्हा देवाघरी न्यायला,
जरा थांब त्याला म्हणता,
म्हणेल तोही तेव्हा,
वेळच कुठंय् तुला ?
वेळच कुठंय् तुला ?

संसार म्हणजे चालायचचं

संसार म्हणजे चालायचचं



घर कितीही आवरलं
तरी दिवसभर पसरायचंच.
कट्टा पुसून ठेवला की
दुध उतू जायचंच
संसार म्हणजे चालायचचं. 

रविवारी एखाद्या खूष होऊन
हॉटेलात मोठ्ठ बिल करायचं.
खिरीतल्या वेलदोड्याचे टरफल मात्र
चहाच्या डब्यात जायचंच.
संसार म्हणजे चालायचचं. 



पोरांसाठी सगळं करतो म्हणलं
तरी कधी त्यांनाच रागवायचं.
रडून झोपले की
पांघरूण घालताना कुरवाळायचं 
संसार म्हणजे चालायचचं. 

बाहेर कितीही चेष्टा केली तरी
तू मला आणि मीच तुला ओळखयाच. 
शॉपिंग ला गेल्यावर,
दोघांनी एकाच स्वस्त वस्तूला उचलायचं.
संसार म्हणजे चालायचचं. 

धावपळ करून का होईना 
चौकोनी कुटुंब सांभाळायचं.
आजारी पडल्यावर, सगळा धीर गळून  
आई-बाबांनाच आठवायचं. 
 संसार म्हणजे चालायचचं. 



जरा एका जागी स्थिरावलं की
पुढे जायला बस्तान हलवायचं. 
आधीचं सोडून चूक तर नाही न केली
हे एकमेकांना विचारायचं.
संसार म्हणजे चालायचचं. 

छोट्या छोट्या गोष्टींवरून 
तुझं माझं भांडण व्हायचंच.
आयुष्य मात्र सगळं विसरून 
एकत्र  होऊन जगायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

कोकण

कोकण

 कोकण म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व
तिला आधार देणारा दिवा....
-----------------
कोकण म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि
गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.....
----------------
कोकण म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा,
त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या....
-------------------
कोकण म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं
जातं, आज्जीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर
झालेला कारभारणीचा चेहरा,


------------------
कोकण म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ,
सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर,....
-------------------
कोकण म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव,
रोखून बघत असलेले मानाचे दगड.......
-----------------
कोकण म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ......
-------------------
कोकण म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण,
त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई......
--------------------
कोकण म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडलांची पुण्याई....
---------------------
कोकण म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी 
माडापोफळीची झाडं.....
--------------------
कोकण म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि 
कण्हेरीची फुलं.....  
----------------------
कोकण म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं,
चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण,
--------------------
कोकण म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला
बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा......
-----------------------
कोकण म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या
आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.....
----------------------
कोकण म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे
आणि वाटप घातलेली उसळ,
-----------------
कोकण म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली
पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत
असलेलं लोणचं.....


-----------------
कोकण म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार
पाउस, आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर....
------------------
कोकण म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं,डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.....
----------------
कोकण म्हणजे लाल डब्याची एष्टी, धुरळा आणि
नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.....
--------------------
कोकण म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा भात उसळ
आणि लाऊडस्पीकर....
------------------
कोकण म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक,
उसळ आणि डबलबाऱ्या,
---------------
कोकण म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट,
करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल,
----------------
कोकण म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा......
-------------------
कोकण म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती,
शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्या आणि
पोरांचं भजन..   
--------------------
कोकण म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा,
पूजा , शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं........
------------------
कोकण म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप,
धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला,
---------------------
कोकण म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं,पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि "टुरलामेंट"........
--------------------
कोकण म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा,
ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं,चकवणारे मासे, लागलेली रापण,
ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका.....
---------------'-----
कोकण म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या
माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या,
------------------
कोकण म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची
तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय
आणि सगळ्याचे डोळ्यात आलेलं पाणी,
खूप काही सांगू पाहणारा, 
पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा
काशीविश्वेश्वराचा एक डाव..

मालवणी म्हणी

मालवणी म्हणी


1) येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात
2) लिना लिना नी भिकार चिन्हा
3) वसाड गावात एरंड बळी
4) वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव
5) सरकारी काम, तीन म्हयने थांब


6) सरड्याची धाव वयपुरती
7) सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा
8) हयरातय नाय नी माशातय नाय
9) हळ्कुंडाच्या पदरात शेळ्कुंड
10) हात पाय र्‍हवले, काय करु बायले
11) हो गे सुने घरासारखी
12) देणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा
13) करुन गेलो गाव आणि .... चा नाव
14) काप गेला भोका रवली
15) कावळो बसाक फांदी मोडाक
16) मोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात
17) हगणार्‍याक नाय तरी बघणार्‍याक होई लाज
18) कापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन
19) गावकारची सुन काय पादत नाय?
20) कपाळार मुकुट आणि खालसुन नागडो
21) कोंबो झाकलॉ म्हणान उजवाडाचा रव्हत नाय
22) दोडकार्‍याचा कपाळात तिनच गुंडे
23) केला तुका - झाला माका
24) कोको मिटाक जाता मगे पावस येता
25) करुक गेलं गणपती आणि झाला केडला
26) कशात काय आणि फटक्यात पाय
27) आपला ठेवा झाकान आणि बघा दुसऱ्याचा वाकान
28) दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती
29) आवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक
30) करून करून भागलो आणि देव पूजेक बसलो
31) जेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप
32) जेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो
33) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय
34) फूडचा ढोर चाल्ताला तसा पाटला
35) भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा
36) आपली मोरी आणि मुताक चोरी?


37) हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
38) गायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय
39) आवस सोसता आणि बापूस पोसता
40) आंधळा दळता आणि कुत्रा खाता
41) अंधारात केला पण उजेडात इला
42) कायच नाय कळाक - बोको गेलो म्हाळाक
43) एक कानार पगडी आणि घराक बायल उघडी
44) येळार येळ - शीगम्याक खेळ
45) घरासारखो गुण, सासू तशी सून
46) चल चल फुडे तीन तीन वडे
47) चव नाय रव धनगरा पोटभर जेव
48) चुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया
49) शेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा
50) उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक
51) मडकेत कडी पाटी जीव ओढी
52) घरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा
53) पडलो तरी नाक वर
54) एक मासो आणि खंडी भर रस्सो
55) खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी
56) धाक नाय दारारो, फुकटचो नगारो
57) तरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ
58) वसावसा खान आणि मसणात जाणा
59) दुकान नाय उघडला, तो इलो उधारेक
60) नावाजललो गुरव देवळात हगलो
61) राती राजा आणि सकाळी कपाळार बोजा
62) डाळ भात लोणचा कोण नाय कोणचा
63) देव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक
64) तुमचा तुमका आणि खटपट आमका?
65) गाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती?
66) सुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा
67) वरये दितय तुका गावकार म्हण माका
68) शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक
69) बघून बघून आंगण्याची वाडी
70) अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो
71) कोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी
72) बारशाक वारशी नसाय आणी अवळात बसलो देसाय
73) पानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणी
74) बघता वडो मागता भजी
75) आवशीक खाव व्हरान
76) बापूस लक्ष देयना आवस जेवक घालीना
77) काकयेत कळशो आणि गावाक वळसो
78) आकाडता बापडा, सात माझी कापडा
79) आयत्यार कोयत्ये
80) आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक
81) इतभर तौसा नी हातभर बी
82) कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी
83) कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी
84) खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच
85) खांद्यार बसयलो तर कानात मुतता
86) खुळा भांडता वझरा वांगडा
87) खेकट्याक मेकटा
88) गजालीन खाल्लो घोव
89) गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी?
90) गावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी
91) गावला तेचा फावला
92) गावात लगीन नी कुत्र्याक बोवाळ
93) चुकला माकला ढॉर धामपुरच्या तळ्यात
94) तुका नको माका नको घाल कुत्र्याक
95) दिसला मडा, इला रडा
96) देणगेसारख्या घोरीप
97) नदी आधी व्हाणो, कढलल्यो बर्‍यो
98) नाय देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे
99) नालकार रडता म्हणान त्यालकार रडता
100) पावळेचा पाणी पावळेक जाताला
101) पिकला पान घळतलाच
102) पोरांच्या मळणेक बी नाय भात
103) भोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली
104) मिठाक लावा नी माका खावा
105) मेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध
106) मोव थय खोव
107) येरे दिसा नी भररे पोटा


मोबाईल

मोबाईल


पप्पा सोडा मोबाईल
माझ्या सोबत बोला
थोडावेळ बागेमध्ये
खेळु आपण चला...!

सोबत तुम्हाला नेहमी 
मोबाईल लागतो केवळ 
घरी आल्यावर तरी
घ्या ना मला जवळ...!



रात्रभर मोबाईल
असतो तुमच्या उशाला
तरीसुद्धा दिवसभर
सोबत ठेवता कशाला...?

पप्पा आज मोबाईल
ऑफिसमध्ये विसरा
माझा चेहरा होईल
आनंदाने हसरा...!


दिवसभर मोबाईल
तुम्ही हातात धरता
माझे बोट धरून
सांगा कधी फिरता...?

पुढच्या जन्मी मला
मोबाईल व्हायच आहे
कारण मला दिवसभर
पप्पांसोबत रहायचं आहे...!

काही नसण़्यातच होता आनंद मोठा

काही नसण़्यातच होता आनंद मोठा


आर्थिक स्टेबिलिटी मिळवताना
बरच गणित चुकत जातं 
"नसण्यातच आनंद असतो "
उत्तर शेवटी हाती येतं !

लहानपणी शाळे मधे 
एकच ड्रेस असायचा 
खाकी चड्डी पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा

पायात चप्पल असणं
ही लक्झरी असायची 
गावात एखाद्या कडेच
"बाटाची"चप्पल दिसायची!



रेशनच्या दुकानावर 
लोकं चकरा मारायचे 
तवा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे !

वरच्या वर्गात जाताना 
पुस्तक जुनेच असायचे 
शुभंकरोती आणि बे एक बे मात्र पोरं
घरोघरी  म्हणायचे !

सडा, सारवण, धुणं, भांडी 
बायकांना तर आरामच नव्हता
ज्याच्याकडे ' पाणी तापवायचा बंब '
तोच सगळ्यात श्रीमंत होता !

दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचं
खऊट खोबर्याच्या तेला मधे
वासाच तेल असायचं !!

कुठला मोती साबण
अन कशाची काजू कतली 
माया, प्रेम एवढं होतं की
गोड लागायची वातड चकली !!

भात, पोळी , गोडधोड
सणासुदिलाच व्हायचे 
पाहुण्याला गरम नी
घरच्याला गार पोळी वाढायचे !


पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स 
आजकाल रूटीन असतं
गरीबीला लपवणं
फारच कठिण असतं.....

स्वयंपाक घरात आता भरपूर
किराणा भरलेला असतो 
खाऊ घालायची वासनाच नाही
म्हणून लोणच्याला बुरा येतो? 

हल्ली आता प्रत्येकाच्ं
पैकेज फक्त मोठ्ठ असतं 
दिवाळीच्या दिवशी सुद्धा
पॉश घर "भकास " वाटतं ?

का बरे पहिल्यासारखे 
पाहुणे आता येत नाहीत ?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत.....

काय तर म्हणे आम्ही आता 
हाय फाय झालो !
चार पैसे आल्यामूळे, खरंतर
सगळेच पुरते वाया गेलो !!

कशामुळे घात झाला 
काहीच का कळत नाही ?
एवढं मात्र खरं की
पहिल्यासारखं
सुख आता अजिबात मिळत नाही ?

प्रगती झाली की अधोगती ?
काहीच उमजेना ??
माणसाला माणसाकडून 
अजिबात प्रेम मिळेना ?

अहंकार कुरवाळल्याने
प्रेमाचे झरे आटलेत
अन् आधार गमावल्यामुळेच
" सायक्याट्रिस्ट " जवळचे झालेत !!

भ्रमामध्ये राहु नका 
जागं व्हा थोडं.....
माणसाशिवाय माणसाचं
सुटत नसतं कोडं !