Tuesday, 27 June 2017

रंग पाण्याचे

रंग पाण्याचे 


'पाणी' शब्द हा असे प्रवाही, वळवू तिकडे वळतो हा.. जशी भावना मनात असते, रूप बदलते कसे पहा..!

नयनामध्ये येता  'पाणी'
अश्रू तयाला म्हणती,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
अशी तयांची महती..!

चटकदार तो पदार्थ दिसता,
तोंडाला या 'पाणी' सुटते,
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते..!



धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,
म्हणती अविरत भरते  'पाणी'..
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी जाते  'पाणी' ..!

"वळणाचे 'पाणी' वळणावरती"
म्हण मराठी एक असे,
"बारा गांवचे 'पाणी' प्यालाय"
चतुराई यातूनी दिसे..!

लाथ मारूनी 'पाणी' काढणे, लक्षण हे तर कर्तृत्वाचे,
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे..!

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,
'पाण्या'त पाहणे गुण खोटा..   
'पाणी'दार ते नेत्र सांगती,
विद्वत्तेचा गुण मोठा..!



शिवरायांनी कितीक वेळा,
शत्रूला त्या 'पाणी' पाजले..
नामोहरम करून, अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले..!

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी' पानावरती,
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,
अळवावरचे अलगद 'पाणी'..!

कळी कोवळी कुणी कुस्करी,
काळजाचे त्या 'पाणी' होते..
ओंजळीतूनी 'पाणी' सुटता,
कन्यादानाचे पुण्य लाभते..!

मायबाप हे आम्हां घडविती,
रक्ताचे ते 'पाणी' करूनी..
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडता 'पाणी'
तुडुंब, दुथडी नद्या वाहती,
दुष्काळाचे सावट पडतां
सारे' पाणी पाणी करती..!

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची..
पितरांना मग 'पाणी' देऊनी,
स्मृती जागते आप्तांची..!

मनामनांतील भावनांचे,
'पाण्या' मध्ये मिसळा रंग..
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,
चेहऱ्यावरती उठे तरंग..!!......

फक्त हिमतीने लढ

फक्त हिमतीने लढ


घरटे उडते वादळात  
बिळा, वारूळात पाणी शिरते 
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही 
शिकार मिळाली नाही म्हणून 
कधीच अनूदान मागत नाही 🐅

घरकुला साठी मुंगी 
करत नाही अर्ज 
स्वतःच उभारते वारूळ 
कोण देतो गृहकर्ज ?🎭



हात नाहीत सुगरणी ला 
फक्त चोच घेउन जगते 
स्वतःच विणते घरटे छान 
कोणतं पॅकेज मागते ?🕴

कुणीही नाही पाठी 
तरी तक्रार नाही ओठी 
निवेदन घेउन चिमणी 
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला 
धाऊन येतो कुत्रा 
लाईफ इन्शुरन्स काढला का ? 
अस विचारत नाही मित्रा🐕

राब राब राबून बैल 
कमाउन धन देतात 
सांगा बरं कुणाकडून 
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂


कष्टकर्याची  जात आपली 
आपणही हे शिकलं पाहिजे 
पिंपळाच्या रोपा सारखं 
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕

कोण करतो सांगा त्यांना 
पुरस्काराने सन्मानित 
तरीही मोर फुलवतो पिसारा 
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧

🐝मधमाशीची दृष्टी ठेव 
फुलांची काही कमी नाही 
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला 
भय, चिंता फासावर टांग 
जिव एवढा स्वस्त नाही 
सावकाराला ठणकाऊण सांग😎

काळ्या आईचा लेक कधी 
संकटापुढे झुकला का ? 
कितीही तापला सुर्य तरी 
समुद्र कधी सुकला का ?🌊💦

निर्धाराच्या वाटेवर 
टाक निर्भीडपणे पाय 
तु फक्त विश्वास ठेव 
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑

निर्धाराने जिंकु आपण 
पुन्हा यशाचा गड 
आयुष्याची लढाई 
फक्त हिमतीने लढ👊

फक्त हिमतीने लढ👊

किचनची शिकवणी

किचनची शिकवणी


ठरवलच जर मनापासून, 
तर कुठे ही शिकता येत. 
किचन मधील प्रत्येक भांड,
काहीतरी शिकवून जात. 1

परात ,मोठी पातेली,
सारच सामावून घेतात.
मन मोठा करा असच,
जणू ते सांगत असतात. 2


नात कस जपायच हेच,
कप बशी सहज शिकवते.
कपाकडून काही चुकले,
तर बशी मात्र संभाळून घेते. 3

गाळणी, चाळणी व झारी,
निवडकपणा शिकवतात.
हव तेच तिघी निवडतात,
नको ते बाजूला करतात. 4 

वेळेच नियोजन कस कराव,
हेच तर कूकर शिकवत असतो. 
एकाच वेळी डाळ,भात शिजवतो, 
आणि बटाटा ही उकडून देतो. 5



मिळूनमिसळून रहा असे,
मिक्सर नेहमीच सांगतो.
मिळेल त्या सगळ्यांना तो, 
मस्त एकजीव करून टाकतो. 6

विळी ,सुरी आणि किसणी,
विषय सहज करायला शिकवतात. 
मोठ्या भाज्या बारीक चिरताना, 
सतत याचीच आठवण देतात. 7 

चमचा, ढवणा चिमटा,
सावधगिरी शिकवत असतात.
स्वतः उष्णता सोसताना ते,
आपला हात मात्र वाचवतात. 8

भांडी ठेवण्याची मांडण, 
सुव्यवस्थापन दाखवून देते.
तीच्या असल्यामुळेच पटकन,
हवी ती वस्तू हाती मिळते. 9

परत किचनमध्ये जाताना,
आता आदरानेच तुम्ही जा.
अजून काय शिकता येईल?
तेही नक्कीच शोधून पहा. 10

कवी एक गृहिणी 😊

फुटका आरसा अन तुटका कंगवा

फुटका आरसा अन तुटका कंगवा

ज्यांचं ज्यांचं वय आज 
40-45 आहे, 
त्यांच्या स्वभावामधे 
बराच संयम आहे.

कुठून आला हा संयम, 
एवढी नम्रता कशी ?
अपमान पचवण्याची 
ताकद आली कशी ?



या प्रश्नांची उत्तरं 
जरूर तुम्हाला मिळतील,
जर तुम्हाला बालपणीचे 
त्यांचे दिवस कळतील. 

दारिद्र्य आणि गरीबी
घरोघरी होती, 
अंग घासायला दगड 
अन दाताला राखुंडी होती. 

कशाचं बॉडी लोशन 
अन् कसचं Hair Gel, 
हिवाळ्यात अंग उललं की 
आमसुलाचं तेल.

तोंड पाहण्यासाठी नेहमी 
फुटका आरसा असायचा 
इतकुश्याच तुकड्यामधे 
एकतर फक्त डोळा ,नाहीतर कान दिसायचा. 


सगळे दात असलेला कंगवा 
कधीही मिळाला नाही, 
अफगाण स्नोचा भाव आम्हाला 
कधीच कळला नाही. 

चड्डी अन् सदऱ्याला 
तांब्याची इस्त्री असायची, 
न्याहारीला लोणच्यासोबत 
शिळी भाकरी मिळायची. 

कबड्डी , लंगडी , कोया 
फ़ुकटे खेळ असायचे, 
दोन्ही घुडगे फुटले तरी 
पोरगे खूश दिसायचे. 

कांद्याचे पोहे अन् 
मुरमुऱ्याचा चिवडा, 
पेढ्याचा तुकडा मिळाला की 
आनंद आभाळाएवढा. 

काजू , बदाम यांच्याबद्दल 
फक्त ऐकून होतो, 
एखादा पाहुणा आला की 
अंगणात नाचत होतो. 

मोठ्या माणसांसमोर जायची 
हिंमतच नसायची,
वडील बैठकीत असले की 
पोरं ओसरीवर दिसायची.

आजकालच्या पोरांना हे 
खरं वाटणार नाही, 
आई वडिलांच्या गरीबीवर 
विश्वास बसणार नाही. 

म्हणून म्हणतो पोरांनो 
आई वडिलांशी बोला, 
काही नाही मिळालं तरी 
आनंदाने डोला. 

नसण्यातच मजा होती 
मोठं झाल्यावर कळतं,
खरं शिक्षण माणसाला 
गरीबीकडूनच मिळतं.
    
   🌹💐 प्रिय...आई वडील 💐🌹