Sunday, 19 April 2015

Whatsapp La Futu De Fod

व्हाट्सअपला उठू दे फोड.



*************************
तिखट झाला चहा आणि
कालवण झालं गोड,
सासू म्हणाली सुनेला,
तुझ्या व्हाट्सअपला उठू दे फोड.

नातू झोपलाय उपाशी,
म्हातारं बसलंय दारात,
व्हाट्सअपशिवाय कुणीही
बोलंना हल्ली घरात.
ज्यालात्याला सांगते 
मोबाईलला चार्जर तेवढा जोड
सासू म्हणाली सुनेला,
तुझ्या व्हाट्सअपला उठू दे फोड.



सकाळी साबण समजून अंगाला
मोबाईल पोरानं घासलाय,
तुझ्यापायी त्या व्हाट्सअपमंदी
पोरगा माझा फसलाय.
च्याटींग करता करता नाल्यात
जातोय सोडून रोड
सासू म्हणाली सुनेला,
तुझ्या व्हाट्सअपला उठू दे फोड.

सैंपाकाचा न्हाई पत्त्या
धुणं पडलंय म्होरीत
रात्रभर व्हाट्सअपमधी
अन सकाळी गुडमॉर्निंग करीत.
ऊठ बघू आधी
हातातला मोबाईल तेवढा सोड,
सासू म्हणाली सुनेला,
तुझ्या व्हाट्सअपला उठू दे फोड.



चपातीसंगं भाजीत तुझ्या
रोजच नसतंय मीठ
भाकरी करायला परातीत घेतेस
गव्हाचं तू पीठ
मटकीचं केलंस कूट
आणलेस शेंगदाण्याला मोड
सासू म्हणाली सुनेला,
तुझ्या व्हाट्सअपला उठू दे फोड.

फेसबुकमधी फेस नसते
हाईकमधी म्हैस
व्हाट्सअपवर चालताबोलता 
पायाला लागली ठेस
तुझ्या व्हाट्सअप प्रेमाला अख्ख्या  गल्लीत नाही तोड
सासू म्हणाली सुनेला,
तुझ्या व्हाट्सअपला उठू दे फोड.

No comments:

Post a Comment