Wednesday, 8 November 2017

तुझ्यासाठी सखे

तुझ्यासाठी सखे



तुझ्यासाठी आज फक्त 
पावसाचा शृंगार केलाय.......
इवल्याशा थेंबांचा 
कंबरपट्टा विणलाय ...
टपोऱ्या थेंबांचे 
डूल घातलेत कानात....


मोठ्ठ्या सरीची 
मोहनमाळ घातलीये गळ्यात ....
लवलवणाऱ्या हिरवाईची 
काकणं भरलीत हातात ...
टपटपणारया पागोळ्यांचा 
नाद गुंफलाय घुंगरात....
चमचमणाऱ्या बिजलीची 
चंद्रकोर रेखलीय कपाळावर .....
आणि सावळया मेघांची 
काजळरेषा पापणीवर .....
सप्तरंगी इंद्रधनू 
ल्यायलेय अंगभर ,
वाऱ्याचा सळसळाट 
घुमतोय पदरावर ......


तुला आवडतं ना म्हणून
मातीच्या सुगंधाचं 
अत्तरही माखलंय ...
अन गोजिरवाणं श्रावणफूल 
केसात माळलंय ...............
बघ तरी सखे ,
तुझ्यासाठी 
आज 
नखशिखांत 
पाऊस 
बनून 
आलेय............

No comments:

Post a Comment