झोपलेल्या राशी
तारवटल्या डोळ्यांनी,
बदलत रहातो कुशी
अंथरुण भर लोळत लोळत,
झोपते मेष राशी ।।
कधी इथे झोप कधी तिथे,
सवय त्याची अशी,
खुट्ट होता ताडकन्
उठते वृषभ राशी ।।
जाडजुड गादी हवी
पलंगपोस मऊ ऊशी,
राजेशाही थाट,
पाय चेपून घेते, मिथुन राशी ।।
दंगा गोंगाट असो किती
झोप यांना येते कशी,
शांत गाढ माळरानीही
घोरते निवांत कर्क राशी ।।
आपलेच अंथरुण पांघरुण
आपलीच तीच ऊशी,
सावधान पोज घेऊनच
निद्रा घेते सिंह राशी ।।
दारे खिडक्या बंद करुन
पुन्हा पुन्हा तपाशी,
अर्धे नेत्र उघडे ठेऊन,
झोपते कन्या राशी ।।
दमसा भागता जीव म्हणे
कधी एकदा आडवा होशी,
ब्रह्मानंदी टाळी लागून,
झोपी जाते तुळ राशी ।।
एक मच्छर भुणभूण कानी
कपाळावर बसली माशी,
माझ्या नशीबी झोप नाही,
म्हणते नेहमी वृश्चिक राशी ।।
ऑफिसात डुलकी खुशाल घेशी,
रित अशी ही उनाडटप्पू
झोपली बघा धनू राशी ।।
सगळं कसं वेळेवर
जांभयी दहाच्या ठोक्याशी,
गजर नाही भोंगा नाही
उठते वेळेत मकर राशी ।।
शिस्तीत आपण रहायचं
तक्रार नाही कशाची,
जिथे जसे जमेल तशी,
निद्रीस्त होई कुंभ राशी ।।
हातपाय घुऊन येऊन
प्रार्थना करून देवापाशी,
दिनकर्माचा आढावा घेते
सात्विकतेने मीन राशी ।।
No comments:
Post a Comment